“पुजारी हटाव, जोतिबा मंदिर बचाव!” – परिते ग्रामस्थांचा संताप उसळला; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

  “पुजारी हटाव, जोतिबा मंदिर बचाव!” – परिते ग्रामस्थांचा संताप उसळला; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा 



कोल्हापूर, ता. ३१ प्रमोद पाटील 

वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसरात परिते ग्रामस्थांना स्थानिक पुजाऱ्यांकडून मारहाण झाल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज परिते ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत पुजाऱ्यांना कायमचे हटवून शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक करण्याची ठाम मागणी केली.

मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून झाली. तेथून व्हिनस कॉर्नर, उद्योग भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचला. या मोर्चात तरुण आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. विशेष म्हणजे, लहान मुलांनी मारहाणीचा सजीव देखावा सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

“पुजारी हटाव, जोतिबा मंदिर बचाव”, “जोतिबाला पुजाऱ्यांच्या जोखडातून मुक्त करा”, “भक्तांची लूटमार थांबवा” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आपला आक्रोश व्यक्त केला. डोक्यावर पांढऱ्या टोप्या घालून ग्रामस्थांनी एकजूट दाखवत आंदोलन अधिक तीव्र केले.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रमुख प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात दोषी पुजाऱ्यांवर कठोर कारवाई करून जोतिबा मंदिरात शासकीय पुजारी नेमावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी “या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच जोतिबा यात्रेनंतर यासंदर्भात बैठक घेण्यात येईल,” असे आश्वासन दिले.

सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले, “जोतिबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. येथे येणाऱ्या भाविकांना पुजाऱ्यांच्या मुजोरीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही लढाई सर्वसामान्य भाविकांच्या हक्कासाठी आहे.”

जनार्दन पाटील यांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले, “पुजारी मंदिर स्वतःच्या मालकीचे असल्यासारखे वागतात. पंढरपूरच्या धर्तीवर येथे शासकीय पुजारी नेमले पाहिजेत.”

जिल्हा बँकेचे संचालक राहुल पाटील यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, “सर्वच पुजारी मुजोर नाहीत; मात्र जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा संतुलित सूरही काही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

या घटनेमुळे जोतिबा मंदिर परिसरातील व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.