जोतिबा यात्रेत माणुसकीचा स्पर्श; बैलांसाठी सहजसेवा ट्रस्टचा चारा वाटप उपक्रम
कोल्हापूर ३१ (मिलिंद कुलकर्णी)
‘चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेत भक्तीबरोबरच माणुसकीचा एक हृदयस्पर्शी पैलू पाहायला मिळतो. आपल्या लाडक्या सर्जा-राजाला घेऊन शेकडो मैलांचा प्रवास करत देवदर्शनासाठी येणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या मुक्या जनावरांचाही प्रवास तितकाच कठीण असतो.
चैत्र महिन्याच्या कडक उन्हात आणि डोंगराच्या अवघड चढणीवरून येताना बैलांची मोठी दमछाक होते. डोंगरावर पोहोचल्यानंतर या जनावरांना चारा आणि पाण्याची सोय सहज उपलब्ध होत नाही. याची जाणीव ठेवत सहजसेवा ट्रस्ट गेली तब्बल २५ वर्षे ‘भूतदया’ आणि माणुसकीचा अनोखा संगम घडवत आहे.
२५ वर्षांची अखंड सेवा
ट्रस्टतर्फे यंदाही कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता १०० हून अधिक बैलगाड्यांमधील बैलांना कपरी पेंड, भुस्सा आणि दर्जेदार चारा वाटप करण्यात आला. “पशूसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे.
भूतदयेचा जिवंत आदर्श
बैलांच्या मुखाशी चारा जाताना पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हे कोणत्याही सन्मानापेक्षा मोठे असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. या उपक्रमामुळे यात्रेसाठी आलेल्या शेकडो बैलांना पोटभर अन्न मिळाले.
“माणूस आपलं दुःख बोलून दाखवतो, पण या मुक्या जनावरांची भूक ओळखून त्यांना तृप्त करणं, हेच चैत्र यात्रेचं खरं पुण्य आहे,”
अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.
सहजसेवा ट्रस्टचे हे सेवाव्रत जोतिबाच्या चैत्र यात्रेतील माणुसकीचा अविभाज्य भाग बनले असून, समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा करत आहे.



