डंका… हरीनामाचा १९ जुलैला चित्रपटगृहात वाजणार

 ‘डंका… हरीनामाचा १९ जुलैला चित्रपटगृहात वाजणार  ’


कोल्हापूर ०१ प्रमोद पाटील 

‘युगे अठ्‌ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’!अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरपूरचा विठुराया..!! दरवर्षी पहिल्या पावसासोबतच वारक-यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचं यथार्थ दर्शन करण्यात आलं आहे. यंदाही टाळ मृदुंगाचा आणि हरिनामाचा गजर करत  ‘डंका… हरीनामाचा’ वाजणार आणि गाजणार आहे. रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.


हरिपूर या छोट्याशा खेड्यातील विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेल्यांनतर गावाचे वैभव हरवते. हे वैभव परत  मिळवण्यासाठी  चोरीला  गेलेली मूर्ती  शोधण्याची मोहीम काही गावकरी घेतात. ही मूर्ती नेमकी कोणाकडे असते? गावकरी ही  मूर्ती  मिळवण्यात यशस्वी  होणार का? याची धमाल मनोरंजक कथा दाखवतानाच विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी विठूरायाशी कसे  एकरूप होतात हे ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.कथेला  साजेशी गाणी चित्रपटात आहेत.  

सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव अशी कलाकारांची मांदियाळी ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटात आहे.


 हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे.  


‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद श्रेयस जाधव, अंशुमन जोशी, संकेत हेंगा यांचे आहेत. छायांकन प्रदीप खानविलकर तर संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे.  कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. वेशभूषा सानिया देशमुख तर साहस दृश्ये परमजीत सिंह ढिल्लोन यांची आहेत. संगीताची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे.


कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र  स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.