प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं 'रात सजनाची' गीत प्रदर्शित
कोल्हापूर ०५ प्रमोद पाटील
हळव्या भावना, प्रेम आणि स्वप्नांच्या संगमाची कहाणी याचं सुरेल दर्शन घडवणारं शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटातील नवं गीत "रात सजनाची" रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “रात सजनाची” हे गाणं एका मुलीच्या लग्नाच्या स्वप्नांची भावना सुंदरपणे व्यक्त करतं. हे गीत लग्नाच्या खास क्षणांची आणि पहिल्या रात्रीच्या गोडसर भावना सादर करतं. हे गाणं त्या नवविवाहितांच्या प्रेमळ संवादाला, त्यांच्या हळुवार स्पर्शाला आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीला रंगत देतं. सजना सिनेमाचं हे गीत पारंपरिक मराठी लग्नाच्या रंगतदार वातावरणात चित्रित केलं आहे.
https://youtu.be/6pcGHDE8gCQ
या मनमोहक गाण्याला ओंकारस्वरूप यांनी संगीतबद्ध केले असून, शब्दरचना केली आहे सुहास मुंडे यांनी. त्यांच्या शब्दांतली भावनांची गहिराई आणि ओंकारस्वरूप यांचे सुरेल संगीत यांचा परिपूर्ण संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. ह्या गाण्याचे गायक प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप हे आहेत. हे गीत भुंगा म्युझिक या लोकप्रिय म्युझिक लेबलच्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आले आहे.
'सजना' या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. प्रेमाच्या विविध रूपांची कहाणी सांगणारा "सजना" हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात २७ जून २०२५ पासून प्रदर्शित होणार आहे !!



