आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; यशवंत निवासस्थानी शुभेच्छांचा वर्षाव
कोल्हापूर १२ (प्रमोद पाटील )
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व माजी गृहराज्यमंत्री आमदार Satej Patil यांचा वाढदिवस रविवारी कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यशवंत निवासस्थानी सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रचंड गर्दी उसळली होती.
यावेळी शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झालेली शुभेच्छांची रांग रात्री उशिरापर्यंत कायम राहिली.
वाढदिवसानिमित्त ‘देऊया गरजूंना साथ, वाढदिनी मदतीचा हात’ या संकल्पनेतून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णांना फळे वाटप तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नगरसेविका स्वालिया बागवान यांच्या वतीने कलिंगड वाटप तर कसबा बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर पार पडले.
गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेल्या अनोख्या उपक्रमांतर्गत पुष्पगुच्छाऐवजी वह्या स्वीकारण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कोल्हापूर महानगरपालिका व गगनबावडा तालुका काँग्रेसकडून प्रत्येकी ५४ हजार वह्यांचे योगदान देण्यात आले. आतापर्यंत या उपक्रमातून ७० लाखांहून अधिक वह्या संकलित होऊन लाखो विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत.
यशवंत निवास परिसरात उभारलेल्या भव्य मंडपात विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी फोनद्वारेही शुभेच्छा व्यक्त केल्या.
दरम्यान, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर ‘गर्दीचा महापूर’ दिसून आला. विविध सामाजिक उपक्रमांमुळे हा वाढदिवस केवळ उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा एक मोठा सोहळा ठरला.



