“एकच चर्चा... युवा मोर्चा!” – कृष्णराज महाडिकांच्या आगमनाने कोल्हापूर दणाणला
कोल्हापूर ०१ (मिलिंद कुलकर्णी)
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. छत्रपती ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो कार्यकर्ते आणि तरुणाई सहभागी झाली होती. “एकच चर्चा… युवा मोर्चा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णराज महाडिक यांचे फलक हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, महिलांकडून औक्षण आणि फुलांची उधळण करण्यात आली.
वर्षभरात १ लाख युवकांना जोडणार
स्वागतानंतर बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, “पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवू. राज्यभरातील १८ ते २८ वयोगटातील युवक-युवतींना संघटित करून वर्षभरात किमान एक लाख युवकांना भाजप युवा मोर्चाशी जोडण्याचा संकल्प आहे. युवा मोर्चाचे संघटन अधिक सक्षम आणि व्यापक करणार.”
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
सजवलेल्या वाहनातून काढलेल्या रॅलीत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्रा. जयंत पाटील, भाजप प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक मार्गे रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. तेथे जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
भाजप कार्यालयात जल्लोष
यानंतर नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. वारकरी वेश, तुळशी हार, शाल-श्रीफळ देत पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. “युवा नेतृत्वाचा सन्मान आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष” अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
कुटुंबियांचे भावनिक स्वागत
दुपारी रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई भरवून त्यांचे स्वागत केले. आई अरुंधती महाडिक, आजी शकुंतला महाडिक यांच्यासह कुटुंबियांनी आशीर्वाद दिला. भावनिक वातावरणात झालेल्या या स्वागतामुळे महाडिक कुटुंबात आनंदाची लहर पसरली.
राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
कृष्णराज महाडिक यांनी येत्या पाच वर्षांसाठी युवा वर्गासाठी व्यापक सामाजिक व्हिजन असल्याचे सांगत लवकरच महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. “सक्षम आणि जागरूक युवा महाराष्ट्र घडवणे हेच ध्येय,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण असून, युवा नेतृत्वाकडून राज्यभरात संघटनात्मक बळकटीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



