कागल नगरपरिषदेतील उमेदवारांची माहिती देण्यास टाळाटाळ; आरटीआय अंतर्गत मागणी, मैनुद्दीन शेख यांचा आरोप

 कागल नगरपरिषदेतील उमेदवारांची माहिती देण्यास टाळाटाळ; आरटीआय अंतर्गत मागणी, मैनुद्दीन शेख यांचा आरोप



कोल्हापूर  १६ मिलिंद कुलकर्णी 

कागल नगरपरिषदेवर निवडणूक लढविणाऱ्या सर्व विजयी उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे, जातीचे दाखले तसेच इतर संबंधित कागदपत्रांची माहिती मिळावी, यासाठी कागल येथील सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांनी माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत कागल नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. मात्र ही माहिती देण्यास संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात असून यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत केला.


लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कागल नगरपरिषद क्षेत्रात निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरण राहणे गरजेचे आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया निष्पक्ष राहील का, याबाबत शंका निर्माण होत असल्याचे मैनुद्दीन शेख यांनी स्पष्ट केले.


दरम्यान आरटीआय अंतर्गत मागवलेली माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली नाही तर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशाराही मैनुद्दीन शेख यांनी दिला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.