जनकल्याणाच्या योजना गावागावात पोहचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवा – खासदार धनंजय महाडिक

 

जनकल्याणाच्या योजना गावागावात पोहचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवा – खासदार धनंजय महाडिक




कोल्हापूर २० मिलिंद कुलकर्णी 

जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी तालुका व गाव पातळीवर प्रत्यक्ष भेटी देत स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील राहावे, अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी खेडी समृद्ध होणे आवश्यक असून, त्यासाठी जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवून कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श बनवावी, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या कार्यालय प्रवेश प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार महाडिक आणि उपाध्यक्ष पाटील यांनी जिल्हा परिषद आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल खासदार महाडिक यांनी जनतेचे आभार मानले. सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास महत्त्वाचा असून, त्यात जिल्हा परिषदेची भूमिका निर्णायक ठरते, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रे व शाळांमध्ये सुविधा सुधारण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून “हर घर नल से जल” मोहीम यशस्वी करण्याचे निर्देश देण्यात आले. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

दरम्यान, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महायुतीच्या नेत्यांमुळे ही संधी मिळाली असून, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांचा विश्वास सार्थ ठरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, प्रदीप झांबरे, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, संतोष पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अरुण जाधव, अमोल चव्हाण, एन. डी. वायंगडे, इंद्रजित पाटील, शिवानी भोसले, सलिम महात, काकासाहेब सावडकर, महेश पाटील, प्रशांत महापुरे, कुमार कांबळे, तसेच माजी सदस्य मनोज फराकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.