#तावडे_हॉटेल

 #तावडे_हॉटेल



पुरात हॉटेल बुडाले हे हॉटेल शंकर कदम ऊर्फ तावडे यांच्यानंतर त्यांची मुले केरबा, पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती आणि मुलगी हौसाबाई यांनी चालविले.


1989 मध्ये पंचगंगेला महापूर आला आणि त्यात निम्मे हॉटेल बुडाले. त्यानंतर शिरोली नाका ते गांधीनगर फाटा रस्ता चौपदरी झाला आणि त्या रस्त्याखालीच तावडे हॉटेलच्या खोपटाचा शेवट झाला. वीस वर्षे झाली, तावडे हॉटेलचे तेथे कसलेही अस्तित्व नाही, पण तावडे हॉटेलच्या आठवणी जाग्या आहेत. त्यामुळेच तावडे हॉटेल नसले तरी त्याची ओळख मात्र राहिली आहे. 


कोल्हापूर - कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईपासून कन्याकुमारी पर्यंतच्या महामार्गावर कोणत्याही ट्रकमध्ये बसायचं, ट्रक ड्रायव्हर कन्नड, तमिळी, मल्याळी बोलणारा असू दे, त्याचा एक शब्दही तुम्हाला नाही कळू दे, कोल्हापुरात उतरायचं असेल तर कोल्हापूर नव्हे, फक्त #तावडे_हॉटेल असे म्हणायचे. तो ट्रक बरोबर कोल्हापूरच्या फाट्यावर येऊन थांबणार, म्हणजेच आपण "तावडे हॉटेल‘ केवळ हा एका शब्दाचा पत्ता सांगून कोल्हापुरात येऊन पोचणार. 


तावडे हॉटेल आणि कोल्हापूरचं नातं असं एक नव्हे, दोन नव्हे, 75 ते 77 वर्षे जपले गेले आहे. विशेष हे, की आज तावडे हॉटेलचं अस्तित्व संपून वीस वर्षे झाली आहेत. तावडे हॉटेलच्या खुणा नव्या चौपदरी रस्त्याखाली पूर्ण गाडल्या गेल्या आहेत. तरीही तावडे हॉटेल केवळ आपल्या नावावर ओळख टिकवून आहे. आज अतिक्रमण हटाओची कारवाई झाली पण चर्चा मात्र अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या तावडे हॉटेलच्याच नावाने झाली आणि तावडे हॉटेल या नावाची ओळख आणखीनच गडद झाली. कोल्हापूर आणि गांधीनगर, वळिवडे, चिंचवाडकडे जाणारा रस्ता ज्या ठिकाणी येऊन मिळतो, तो फाटा म्हणजे तावडे हॉटेल फाटा. आज या फाट्याला हॉटेलचे अस्तित्व सांगणारा एकही प्रत्यक्ष पुरावा नाही पण हॉटेल माहीत नाही असा एकही ट्रक, लक्‍झरी, एसटी ड्रायव्हर मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत मिळणार नाही. 


ज्यावेळी पुणे-बंगळूर हायवे शिरोली, शिरोली नाका, रुईकर कॉलनी, कावळा नाका, रेल्वे फाटक असा होता, त्यावेळी गांधीनगरकडे जाणाऱ्या फाट्याला 1940 मध्ये शंकर कदम ऊर्फ तावडे यांनी एका खोपटात हे हॉटेल सुरू केले. हॉटेल साधं छपराचं. पांढऱ्या भिंतींचं. दारात दोन लाकडाची बाकडी, रात्री एका बांबूला अडकवलेला मिणमिणता कंदील. त्या काळात ते हॉटेल म्हणजे जाणाऱ्या-येणाऱ्यांसाठीचा क्षणभराचा थांबा. या हॉटेलात चहा, भजी आणि बिस्किटाचा पुडा मिळायचा. शंकर कदम आणि त्यांची बायको गिरीजाबाई हॉटेल चालवायचे व सहकुटुंब हॉटेलच्या मागेच एका छपरात राहायचे. 


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे निर्वासित वळिवड्याला निर्वासित छावणीत राहायचे. त्यांच्यासाठीच जे साहित्य येईल ते या हॉटेलच्या दारातच उतरवले जायचे व तेथून टांग्याने किंवा बैलगाडीने छावणीत पोचवले जायचे. हे हॉटेल म्हणजे रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंचा आधार होते. हॉटेलच्या दारातील मिणमिणता कंदील हे एकट्या-दुकट्या वाटसरूला आधाराचे स्थान होते. 


या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रक ड्रायव्हरचे हक्काने थांबण्याचे ठिकाण म्हणजे तावडे हॉटेल. ऍल्युमिनिअमच्या पेल्यातील पाणी आणि कपभर चहा घेतला, की ड्रायव्हर तरतरीत व्हायचा आणि पुढे मार्गस्थ व्हायचा. त्यामुळे तावडे हॉटेलचे नाव दळणवळणाच्या क्षेत्रात एक संकेतस्थळ होऊन गेले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.