महाराष्ट्रात सर्वत्र 'झिम्मा २'चा बोलबाला

 महाराष्ट्रात सर्वत्र 'झिम्मा २'चा बोलबाला 



कोल्हापूर १  प्रमोद पाटील प्रतिनिधी

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला असून हा चित्रपट चांगलाच गाजतोय. सध्या 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांतील थिएटरमध्ये महिलांचा 'झिम्मा २'ला मोठा प्रतिसाद मिळतोय. सात मैत्रीणींची ही सहल प्रेक्षकांना आवडत असतानाच चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजत आहेत. बायका थिएटरमध्ये गाण्यांवर ठेका धरत आहेत. विनोदावर, संवादांवर टाळ्या, शिट्या वाजवत आहेत. एकंदरच सिनेरसिक हा चित्रपट एन्जॉय करत आहेत. बऱ्याच थिएटरमध्ये सगळे शोज हाऊसफुल्ल जात असून मोठ्या ग्रुपने प्रेक्षक चित्रपट पाहायला येत आहेत. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहाता  'झिम्मा २' लवकरच 'झिम्मा'चाही रेकॉर्ड ब्रेक करणार असे दिसतेय. 

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' आमचा चित्रपट आता आमचा राहिला नसून तो तुम्हा सर्वांचा झाला आहे. चित्रपटाला  मिळणारा प्रतिसाद, प्रतिक्रिया पाहाता प्रेक्षकांनी 'झिम्मा' प्रमाणेच 'झिम्मा २'लाही आपलेसे केले आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत असून तिथल्या प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहोत.  'झिम्मा २' अधिक चांगला असल्याच्या प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. या चित्रपटाला केवळ मैत्रिणीच नाही तर मित्रही येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. इंडस्ट्रीतील माझ्या मित्रमैत्रिणींही मला फोन करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्यांना 'झिम्मा २'आवडतोय हे समाधान देणारे आहे. आमच्या थिएटर दौऱ्यात अनेक ठिकाणी आम्हाला 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकताना दिसत आहेत. पुढील आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंगही 'हाऊसफुल्ल' झाल्याचे दिसतेय. खूप मस्त फिलिंग आहे. या प्रेमासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.'' 

कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.