पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या :राजेश क्षीरसागर

 पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या :राजेश क्षीरसागर

 


शहरातील पूरग्रस्त ठिकाणांची महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी


उद्या दि.२७ जुलै रोजी महानगरपालिकेत आढावा बैठक


कोल्हापूर दि.२६ प्रमोद पाटील 

 सन २०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत. महापूरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. पण, प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे, प्रशासनाने त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनास दिल्या. कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकार्यांन सोबत पाहणी केली.

श्री.राजेश क्षीरसागर यांनी दुपारी पंचगंगा तालीम, शुक्रवार पेठ, शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा,  बापट कॅम्प आदी भागाची पाहणी केली. याठिकाणी नागरिकांशी संवाद साधून स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन केले. प्रशासनानेही नागरिकांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना दिल्या. यासह ठिकठिकाणी औषध फवारणी, वैद्यकीय शिबीर, स्थलांतर केलेल्या नागरिकांसाठी निवारा केंद्र, अल्पोपहारासह जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. 

यावेळी सूचना देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा उत्तम ठेवा. पूरस्थिती काळात निर्माण होणारी रोगराई पाहता कचरा उठावाचे काम नियोजनबद्ध झाले पाहिजे. पुराच्या पाण्यासह वाहून आलेला कचरा तात्काळ साफ करावा. रोगाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पूर परिस्थिती दरम्यान आणि ओसरल्यानंतर सदर भागात औषध फवारणी करण्यात यावी. यासह शहरातील प्रत्येक प्रभागात महानगरपालिका प्रशासनाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. शाहूपुरी, बापट कॅम्प आदी भागातील कुंभार बांधवांच्या गणेशमूर्ती स्थलांतरीत करण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी त्याकरिता आवश्यक यंत्रणाही देण्याचा प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.


पाणी पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्या : राजेश क्षीरसागर

पाहणी दरम्यान शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्याची माहितीही श्री.राजेश क्षीरसागर यांनी घेतली. यावेळी सूचना देताना बालिंगा पम्पिंग स्टेशन बंद झाल्यास थेट पाईपलाईन द्वारे शहरास सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा. महापालिका पाणी पुरवठा टँकरची संख्या वाढवून कळंबा पम्पिंग स्टेशन वरून पाणीपुरवठा करण्यात यावा, पाण्यावाचून नागरिकांचे हाल होणार नाहीत याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.


यासह नागरिकांशी संवाद साधताना, अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक शासनाशी चर्चा करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यास शासन सज्ज आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले आहेत पण पाण्याचा विसर्गही त्याच प्रमाणात होत आहे. पावसाचा जोर पाहता नागरिकांनी गाफील न राहता आणि  घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून वेळीच स्थलांतरीत व्हावे. शिवसेनेच्या वतीनेही पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत कार्य सुरु आहे. प्रशासनासह शिवसैनिक संभाव्य पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले.  


स्थलांतरीत नागरिकांची श्री.क्षीरसागर यांच्याकडून आपुकीने चौकशी

दरम्यान पूरग्रस्त भागाची पाहणी दरम्यान शाहूपुरी येथील स्थलांतरीत नागरिकांची अंबाबाई शाळा आणि सुतारवाडा येथील नागरिकांची चित्रदुर्ग मठ येथे व्यवस्था केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या स्थलांतरीत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी श्री.राजेश क्षीरसागर यांनी या दोन्ही ठिकाणांना भेट देवून, स्थलांतरीत नागरिकांची आपुलकीने चौकशी केली. शाहूपुरी येथील नागरिकांना राधाकृष्ण मंदिर, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल याठिकाणीही स्थलांतरीत करून याठिकाणी सुविधा पुरविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या. यासह निवारा केंद्रामध्ये पावसाच्या पाण्याची गळती, अपुरा पाणी पुरवठा अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देवून यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 


उद्या दि.२७ जुलै रोजी महानगरपालिकेत आढावा बैठक

पूरस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांच्या संदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि.२७ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक अभियंता फफे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, विनय वाणी, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, अल्पसंख्याक सेनेचे रियाज बागवान, राकेश पोवार, आकाश झेंडे, बंडा माने, अभिजित काशीद, प्रशांत नलवडे, अमर क्षीरसागर, अभिजित कुंभार, आदी शिवसेना पदाधिकारी आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आदी उपस्थित होते.   



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.