भरधाव कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू

 भरधाव कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू 





कोल्हापूर १९ प्रतिनिधी

येथील दसरा चौक ते कसबा बावडा रोडवर महावीर कॉलेजसमोर ‘भारत सरकार, जीएसटी’ असा फलक असलेल्या भरधाव अलिशान कारने बुधवारी एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वरूण रवी कोरडे (वय २२, रा.उदयसिंगनगर, महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. अपघात चौघे जखमी झाले.

भरधाव कारने दोन कारसह सात दुचाकींनाही जोरात धडक दिली. त्यानंतर कार दोन ते तीनवेळा उलटली. रात्री साडेदहा वाजता हा अपघात घडला. दरम्यान, अपघात पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, एमएच १० ईए ९४९५ या नंबरची आणि भारत सरकार, जीएसटी विभाग असे लिहिलेली कार बावड्याकडून भरधाव वेगाने शहराच्या दिशेने येत होती.

प्रचंड वेगात असलेल्या कारने पहिल्यांदा महावीर कॉलेजसमोर बॅडमिंटन खेळून घरी जाणारा वरून काेरडे या दुचाकीस्वाराला उडवून सुमारे दहा फूट फरफटत नेले. महावीर कॉलेजच्या बाजूकडील फुटपाथलगत लावलेल्या दुचाकींना धडकत समोरून येणाऱ्या कारला जोरात त्याने धडक दिली. त्यानंतर त्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारलाही उडवले. यामध्ये एकूण तीन कारचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, धडक बसल्यानंतर जोरात आवाज आला. त्यावेळी आजूबाजूसह बघ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धडक दिलेल्या कारच्या चालकास चांगलाच चोप दिला. जमावाकडून त्याला पोलिसांनी सोडवून घेत ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.