घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाची उत्साहात सुरुवात
कोल्हापूर, दि. ४ प्रतिनिधी
घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड येथे राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कंपनीचे व्हाइस प्रेसिडंट श्री. विहंग जोशी यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कर्मचारी , कामगार यांनी औद्योगिक सुरक्षिततेची शपथ घेतली.
यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. “सुरक्षा प्रथम” या ब्रीदवाक्याचा अवलंब करून अपघातमुक्त कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात सुरक्षा जनजागृती रॅली, पोस्टर स्पर्धा, अग्निशमन प्रात्यक्षिके, तसेच कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण सत्रांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे कार्यस्थळी संभाव्य धोके ओळखणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे यावर भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सुरक्षित, निरोगी आणि अपघातमुक्त कार्यपरिसर राखण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.



