“लाखो ज्योतिबा भक्तांसाठी सहज सेवा ट्रस्टचे रौप्यमहोत्सवी अन्नछत्र; गायमुखावर ३० मार्चपासून सेवा”

  “लाखो ज्योतिबा भक्तांसाठी सहज सेवा ट्रस्टचे रौप्यमहोत्सवी अन्नछत्र; गायमुखावर ३० मार्चपासून सेवा” 



कोल्हापूर २६ प्रमोद पाटील 

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भक्तिमय अशा ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त, कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्टतर्फे यंदा रौप्यमहोत्सवी अन्नछत्र मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. दि. ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत ज्योतिबा डोंगरावरील गायमुख परिसरात हे अन्नछत्र २४ तास अखंड सुरू राहणार आहे.



सन २००१ साली काही संवेदनशील व्यक्तींनी सहज सेवाभावनेतून सुरू केलेला हा उपक्रम आज २५ वर्षांचा टप्पा पार करून रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. सुरुवातीला तरुणांच्या छोट्या गटाने सुरू केलेले हे कार्य आज हजारो भक्तांच्या सेवेसाठी उभे राहिले असून, पहिल्या दिवसापासूनचा उत्साह आजही कायम आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्योतिबा चैत्र यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून सुमारे ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. या लाखो भाविकांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्ट गेली २५ वर्षे सातत्याने कार्यरत आहे.

यंदाच्या अन्नछत्रासाठी सुमारे २ लाखांहून अधिक यात्रेकरूंना भोजन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी तब्बल १५ हजार चौरस फूटाचा भव्य मंडप, तसेच चहा व मठ्ठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी अन्नछत्र दिवस-रात्र सुरू ठेवण्यात येणार असून, रात्री उशिरा पोहोचणाऱ्या भाविकांनाही पोटभर भोजन मिळणार आहे. तसेच पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन स्टेनलेस स्टीलच्या ताटांचा वापर करण्यात येणार आहे.

अन्नछत्रासाठी मोठ्या प्रमाणात अन्नसाहित्याची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये १९ हजार किलो तांदूळ, ३ हजार किलो तूरडाळ, ६ हजार किलो तेल, ७ हजार लिटर दूध, तसेच भाजीपाला, चहा, मसाले यांचा समावेश आहे.

या उपक्रमासाठी सुमारे २० मुख्य आचारी, १०० पेक्षा अधिक महिला व ४०० स्वयंसेवक अहोरात्र सेवा देणार आहेत. पोलीस, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, परिवहन विभाग आणि विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्यही लाभत आहे.

विशेष म्हणजे, यात्रेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच २४ तास वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिकाही उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

यावेळी पत्रकार प्रमोद पाटील, सन्मती मिरजे, चिंतन शहा, चेतन परमार, मनीष पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

या सेवाभावी उपक्रमासाठी देणगी देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी सहज सेवा ट्रस्ट, शाहूपुरी, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

“भक्तांच्या सेवेसाठी समर्पित असलेले हे अन्नछत्र म्हणजे केवळ भोजन नव्हे, तर सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत आदर्श आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.