“लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स” संदेशासह कोल्हापूरमध्ये कंदमूळ महोत्सव उत्साहात पार

 “लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स” संदेशासह कोल्हापूरमध्ये कंदमूळ महोत्सव उत्साहात पार


कोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोप

कोल्हापूर १५ मिलिंद कुलकर्णी 

 निसर्गअंकुर, कोल्हापूर वुई केअर, एनजीओ कम्पॅशन २४ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, युथ ऍनेक्स व वुई केअर हेल्पलाईन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कंदमूळ महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात, दसरा चौक येथे भरलेल्या या महोत्सवाला कोल्हापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

या महोत्सवामध्ये २५० हून अधिक कंदमुळांचे माहितीपूर्ण व शास्त्रीय प्रदर्शन मांडण्यात आले होते. अनेकांनी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या कंदमुळांची खरेदी केली, तर काहींनी आपल्या बागेत व शेतात लागवडीसाठी कंदमुळे घेतली. कंदमुळांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही नागरिकांनी घेतला.

प्रदर्शनामध्ये अतिशय दुर्मिळ व लुप्त होत चाललेली प्राचीन कंदमुळे पाहायला मिळाली. रताळे, बटाटे, अळू व हळदीचे विविध प्रकार तसेच त्यांच्या औषधी गुणधर्मांबाबत व आहारातील उपयोगाबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये या कंदमुळांविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली.

प्राचीन काळात आदिमानवापासून ते रामायण-महाभारत काळात कंदमुळे आहारातील महत्त्वाचा घटक मानले जात होते. कालांतराने त्यांचे महत्त्व कमी झाले असले तरी या प्रदर्शनामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांतील विविध कंदमुळे लोकांना पाहता आली व त्यांची ओळख झाली, असे निसर्ग अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सांगितले.

मोहन माने यांच्या प्रयत्नातून पाच राज्यांमधील सुमारे २५० प्रकारची कंदमुळे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. “लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स” या ब्रीदवाक्याचा स्वीकार करून आपल्या मातीत उगवणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी असे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचे एनजीओ कम्पॅशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सांगितले.

या प्रदर्शनामध्ये कणगा, काटे कणंग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, कडुकंद, आळसी, शेवळा, सुरण, हवाई बटाटे, कंदीका तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळूचे विविध प्रकार मांडण्यात आले होते. याशिवाय काळी हळद, आंबेहळद, रानहळद यांसारखे हळदीचे प्रकार तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे अशा विदेशी कंदमुळांचाही समावेश होता.

या प्रदर्शनासाठी गार्डन्स क्लब, सौ. मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय (मलकापूर), युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन यांचे सहकार्य लाभले.

समारोपप्रसंगी वुई केअरचे प्रमुख मिलिंद धोंड, निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर, मोहन माने, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, भूषण पाटील, अभिजीत पाटील, अमृता वासुदेवन, सुप्रिया भस्मे, प्रा. अशोक वाली, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.