श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी.

 श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी




कृष्णेचं बारमाही वाहणारं पात्र, काळ्या दगडातला घाट आणि घाटावर मध्यभागी औदुंबराखाली असलेलं दत्त मंदीर....


नृसिंह सरस्वती इथे 12 वर्षे वास्तव्याला होते. त्यांनी स्थापन केलेली दत्त महाराजांची पाऊलं म्हणजे अखंड शक्तीचा स्रोत.....कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेलं वाडीचं दत्त मंदिर म्हणजे जीवाला शांती. इथे नृसिंह सरस्वतींनी बारा वर्ष वास्तव्याला होते, यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरुन त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका म्हणतात. 


घरातूनच दत्त भक्तीचं बाळकडू मिळालं. पार गिरनार पासून कुरवपुरपर्यन्त सगळ्या दत्त स्थानांच्या अनेकदा वाऱ्या झाल्या, पण नरसोबाची वाडीची बातच और आहे. दत्त महाराज....नुसत्या नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता....एकाच हाकेला धावणारी माऊली....


वाडीचं वेड, आणि वाडीची ओढ, नेमकी कधी आणि कशी लागली माहिती नाही. कधीही मनात आलं की मिळेल ती बस अथवा ट्रेन पकडून वाडीला पोहोचायचं, एक-दोन दिवस तर कधी कधी आठवडाभर राहून परतीला लागायचं हे कायम ठरलेलं.


संथ वाहणारी कृष्णामाई आणि मंदिरात ऐकू येणारे मंत्र यात कृष्णाकाठी तास न तास बसलं तरी कंटाळा येत नाही. शांत चित्ताने, मनात कोणताही विचार न आणता काठावर बसलं की अनेक न उलगडणार्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते. मुंबईच्या गजबटापासून दूर शांत, पवित्र, प्रसन्न वाडीत मन रमतच. 


वाडीला गेल्यावर सकाळची आरती, दुपारी बाराची महापूजा, दुपारी 3 ला होणारं पावमान सूक्त(दुपारी पावमान चालू असताना दत्त महाराजांची फेरी असते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्याने बरेच भाविक यावेळेत मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात) रात्रीची श्रींची पालखी....सगळं न चुकवण्यासारखं. नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय टेम्भे स्वामी, नारायण स्वामी, काशीकरस्वामी, गोपालस्वामी, मौनीस्वामी इ. समाधी मंदिरं आहेत.


वाडीचं दत्तमंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. पुजार्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला, तिला दिसू लागले. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. 


नदी पलीकडे असणारी औरवाडचं अमरेश्वर आणि घेवड्याच्या शेंगांचे मंदिरही बघण्यासारखे आहे. अमरेश्वर मंदिरात आजही योगिनींचा वास असून त्या नियमित महाराजांच्या पूजेसाठी येतात, असे सांगितले जाते. अमरेश्वर मंदिरामागे असलेल्या गावात घेवड्याच्या शेंगांचे मंदिर आजही कुलकर्णी कुटुंब आनंदाने सांभाळत आहेत. गुरुचरित्रात अठराव्या अध्यायात घेवड्याच्या शेंगांच्या झाडाची कथा आहे. या व्यतिरिक्त जवळ असलेल्या शिरोळ गावी असलेलं भिक्षापात्र मंदिर, खिद्रापूरचं धोपेश्वरमंदीर पण सुंदर आहे. पण वाडीला येणाऱ्या बऱ्याच भक्तांना या चारही मंदिराबाबत काहीच माहिती नाही. 


वाडी आणि परिसरात अनेक दिव्य अनुभव आजही भक्तांना येतात. महाराजांच्या अस्तित्वाची खात्री महाराज देतच असतात. त्यांच्याकडे काही मागावं लागत नाही, मागण्या आधीच ते आपल्या पदरात आलेलं असतं.


चींता कसया करतोस 

येई भेटाया नरसोबा वाडीला

दत्तच उभा राही तुजा अडीनडीला!


याची प्रचिती वाडीला गेल्यावर येतेच येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.