कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे २०२४ चे पुरस्कार जाहीर
कोल्हापूर ३ प्रमोद पाटील
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक यांची प्रातिनिधीक शिखर संघटना असून गेल्या ४१ वर्षांपासून व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करीत आहे.
उद्योग व व्यापार क्षेत्रातील सभासदांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी व शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यापारी - उद्योजकांना गौरवण्याची परंपरा २०१८ सालापासून सुरु आहे. त्याप्रमाणे कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार- कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष कै. शिवाजीराव देसाई यांचे कार्य व माहीती होणे तसेच चेंबर स्थापन करुन व्यापार/उद्योगाला न्याय दिला याचे स्मरण होणेसाठी हा पुरस्कार दिला जातो. कै. परशराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार- कोणतेही अभियांत्रिकेचे शिक्षण नाही. पण स्वत:च्या आत्मशक्तीवर उद्योग क्षेत्रातील इंजिनिअरांना लाजवेल अशा पध्दतीने काम करणारे व स्वत:चा उद्योग क्षेत्रात ठसा उमटविणारे. त्यांची प्रेरणा उद्योग जगताला मिळावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार- कोणतीही व्यापारी पार्श्वभुमी नसताना सचोटीने व्यापार करुन सर्व क्षेत्रात प्रगती करणारे तसेच व्यापाराबरोबर मनोभावे समाजसेवा केल्याबद्दल त्यांच्या नांवे हा पुरस्कार दिला जातो. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष कै. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती जतन करणेसाठी सन २०२२ पासून कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार – उद्योग पुरस्कार- चेंबरचे उपाध्यक्ष असतानाचं आमदार पदी निवडून आले. नवीन व्यापारी व उद्योजक तयार व्हावेत अशी इच्छा होती व ज्या पध्दतीने काम सुरु होते पण काळाने घाला घातल्याने त्यांचे स्वप्न अपुरे राहीले. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणेसाठी व त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावांने पुरस्कार दिला जातो.
सन २०२४ चे पुरस्कार प्राप्त मान्यवर
१) कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार- श्री. भानुदास गोविंद रायबागे (रायसन्स ग्रुप)
२) कै. परशराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार - श्री. मुबारक गौसलाझम शेख (न्यू मेल्टिंग सेंटर प्रा. लि.)
३) कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार - सौ. शकुंतला बाबुराव बनछोडे (अन्नपुर्णा स्पाइसेस प्रा. लि.)
४) कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार – उद्योग पुरस्कार-
१) सौ. सीमा संजय शहा (सीमाज् मोहक फूडस् एलएलपी)
२) श्री. संदीप सुधाकर पोरे (पोरे ग्रुप, गेनमॅक्स फेरोकास्ट प्रा. लि.)
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा सहावा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी, दुपारी ४.०० वाजता, गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब, खासबाग, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दीपेन आगरवाल- प्रेसिडेंट, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, मुंबई व श्री. मोहन गुरनानी- चेअरमन, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, मुंबई हे उपस्थित राहणार असून ते व्यापार, उद्योगावरील आव्हाने- संधी व संघटनेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी श्रीमती जयश्री जाधव- माजी आमदार- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ, श्री. ललित गांधी- अध्यक्ष- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई व श्री. धैर्यशील पाटील- अध्यक्ष- दि ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन व दि महाराष्ट्र कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सन २०२४ या वर्षाकरीता पुरस्कार निवड समितीने निवडलेल्या खालील उद्योग व व्यापार क्षेत्रातील नामवंताना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
१) कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार- २०२४- श्री. भानुदास गोविंद रायबागे (रायसन्स ग्रुप)
आज “रायसन्स” ग्रुप हा बहुव्यावसायीक बिझनेस ग्रुप म्हणून ओळखला जातो तो म्हणजे बी. जी. तथा भानुदास गोविंद रायबागे यांच्या दुरदृष्टी धोरणांमुळेच. वडिलांच्या निधनामुळे घरची परिस्थिती हालाखीची होती. कॉलेज करत असताना घरी वीज नसल्याने ते स्ट्रीट लाईट खाली अभ्यास करायचे. घरच्या परिस्थितीमुळे नातेवाइकांनी मदत करुन त्यांना म्हैस घेऊ दिली. आईसोबत गंगावेश येथे दूध कट्ट्यावर म्हैस घेऊन दूध विकायचे. १९६७ साली बी.एस.सी. फर्स्ट क्लासने पास झाले. मुटाट येथे एक वर्षाची नोकरी केली. परंतु, टेक्नीकल जॉब करुन पैसे मिळवावेत असे ध्येय धरुन ते परत कोल्हापूरला आले. १९८० मध्ये राहत्या जागेतच लहानसे घर बांधले आणि घरी एक टेस्टींग लॅबोरेटरी बनवली. १९८४ साली दुकानगाळा घेऊन व्यवसाय तेथे शिफ्ट केला व त्यास “रायसन्स” असे नांव दिले. इक्विपमेंट बनवणे, विक्री करणे त्याचबरोबर फाउंड्रीला लागणारा कच्चा माल पुरवठा करणे असा व्यवसाय करत “रायसन्स” ची भरभराट चालूच ठेवली. १९८७ मध्ये शिरोली एमआयडीसी मध्ये व्यवसायासाठी जागा खरेदी केली आणि रेझीन सँड तयार करण्याचे जुने मशिन घेऊन नव्या व्यवसायास सुरुवात केली. वेगळ्या प्रकारची व्यवसाय करण्याची वृत्ती असल्याने त्यांनी एकामागोमाग एक असे पाच रेझीन कोटेड सँड बनवण्याचे कारखाने उभे केले. “रायसन्स” समूह सध्या रेझीन कोटेड सँड बनवणारी देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनलेली आहे. त्याचबरोबर हॉटेल व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, फाउंड्री उद्योग, वीज निर्मिती व विक्री तसेच रिटेल उद्योगामध्ये देखील विस्तार झालेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करीत त्यांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
२) कै. परशराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार - २०२४- श्री. मुबारक गौसलाझम शेख (न्यू मेल्टिंग सेंटर प्रा. लि.)
मुबारक शेख यांनी शाळेत असतानांच वडिलांच्या वर्कशॉप मध्ये उद्योजकतेचे प्राथमिक शिक्षण घेतले. मोल्डिंग, कास्टींग, मशिनिंग, फिटींग या सर्व प्रक्रिया त्यांच्या हाताखाली आत्मसात केल्या. १९८३ साली साखर कारखान्यांना लागणारे स्पेअर पार्टस् तयार करण्यास सुरुवात केली. १९८५ साली मे. एम. जी. इंडस्ट्रीज या नावाने नॉन फेरस युनिट सुरु करुन स्वत: डिझाइन केलेले ऑईल फायर फर्नेस वापरुन उत्पादनाची सुरुवात केली. २०१४ साली न्यू मेल्टिंग सेंटर प्रा. लि. ची स्थापना केली. ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढत्या मागणीनुसार टोकियो हाय प्रेशर मोल्डिंग ही ताशी १३० मोल्ड असणारी लाईन स्थापित केली. त्यांच्या उद्योग समूहाने किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, इमरसन क्लायमेट टेक्नॉलॉजी, हुंडाई ग्रुप सारख्या मोठ्या नामांकित कंपन्यासाठी गुणवत्तापूर्ण उत्पादन केले. या यशस्वी प्रवासास २०११-१२ साली महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योग पुरस्कार मिळाला. उद्योग क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल कोल्हापूर चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने त्यांना यावर्षीचा कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
३) कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार – २०२४- सौ. शकुंतला बाबुराव बनछोडे (अन्नपुर्णा स्पाइसेस प्रा. लि.)
सौ. बनछोडे यांनी १९६९ साली स्वत: घरगुती स्वरुपात कांदा लसुण चटणी बनवून ‘रुचिरा’ उद्योगाची सुरुवात केली. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनंतर १९८० साली चार महिलांसह रुचिरा फूड प्रॉडक्टस् या फर्मची सुरुवात करुन संपूर्ण जिल्ह्यात पुरवठा सुरु केला. २००० साली बालिंगे येथे नविन कारखान्याची सुरुवात केली. अन्नपुर्णा स्पाइसेस या कंपनीची उत्पादने सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व बेळगांव येथे वितरकांमार्फत उपलब्ध करुन दिली जातात. आता चटणीसह ३५ उत्पादने बाजारात आणली आहेत. व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे त्यांना कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
४) कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार – उद्योग पुरस्कार- २०२४
१) सौ. सीमा संजय शहा (सीमाज् मोहक फूडस् एलएलपी)
आपले लग्न व्यापारी कुटुंबात व्हावी अशी इच्छा असणाऱ्या सौ. सीमा शहा यांचा विवाह नोकरी करत असलेल्या संजय शहा यांच्याशी झाला. पण त्यांच्यातील उद्योजक होण्याची इच्छा काही कमी झाली नाही. १९९५ साली वडिलोपार्जित जमीन वाट्याला आल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. घरची परिस्थिती बेताची असल्याने जिल्हा उद्योग केंद्राच्या पंतप्रधान रोजगार योजनेतून कर्ज घेतले. ही रक्कम व्यवसाय करण्यास तोकडी पडत असल्याने घरातील फर्निचर विकून १९९५ साली मोहक लस्सी अँड स्नॅक्स हा उद्योग सुरु केला. त्यांनी आपल्या पतीनांही व्यवसायाची आवड निर्माण करुन प्रतिष्ठित उद्योजक बनविले. पदार्थांच्या गुणवत्तेमुळे त्यांनी लस्सी व ताक यावर न थांबता दुग्धजन्य पदार्थांची उत्पादने करण्यास सुरूवात केली. त्यांची व्यवसायाची भरारी वाढतच गेली. व्यवसायाचा व्याप वाढवून हजारो हातांना काम देता येईल हा दृष्टीकोन असल्याने "सीमाज् मोहक फूडस् एलएलपी" ची स्थापना केली. त्यांना कोल्हापूर चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने चंद्रकांत जाधव नव व्यापार पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
२) श्री. संदीप सुधाकर पोरे (पोरे ग्रुप, गेनमॅक्स फेरोकास्ट प्रा. लि.)
१९९१ साली शिरोली एमआयडीसी येथे प्लॉट घेऊन “पोरे इंडस्ट्रीज” या नावांने व्यवसायाचा श्रीगणेशा केला. मनातील जिद्द व अपार कष्टाच्या जोरावर संदीप पोरे यांनी व्यवसायात चांगला जम बसवत १९९९ साली “गेनमॅक्स फेरोकास्ट प्रा. लि.” व त्यानंतर २०१० साली “आयकॉनिक कास्टींग्ज प्रा. लि.” या कंपन्यांची स्थापना करुन व्यवसायात गरुडभरारी घेतली. दोन लेथ मशिन घेऊन सुरु केलेल्या या व्यवसायाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले आहे. सुरुवातीला महिंद्र अँड महिंद्र कंपनीला ऑटो पार्टस् आणि कम्पोनन्टस् चा पुरवठा करत त्यांनी टाटा मोटर्स लि., हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो लि., कॅटरपिलर, जॉन डियर, बॉश, एस्कॉर्टस् क्युबा लि, पोकलेन हायड्रॉलिक्स अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादने पुरवठा करुन नावलौकीक मिळवला. व्यवसायातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ग्रीन कंपनी अवॉर्ड, महिंद्रा सप्लायर अवॉर्ड, पंचरत्न अवॉर्ड, कॅटरपिलर सप्लायर एक्सलन्स अवॉर्ड अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. या आणि विस्तारणाऱ्या उद्योग स्वप्नांना मानाचा मुजरा करीत त्यांना यावर्षीचा कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार उद्योग पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ व्यापारी, उद्योजक व व्यावसायीकांना प्रोत्साहीत करणारा आहे. तरी सर्व सभासद, व्यापारी–उद्योजक व नागरिकांनी पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहावे अशी विनंती करीत आहोत.
पत्रकार परिषदेस कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष आनंद माने, मानद सचिव जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, खजिनदार राहुल नष्टे, संचालक संपत पाटील आदी उपस्थित होते.



