सिद्धगिरी कारागीर महाकुंभ संपन्न; ५ लाख लोकांनी अनुभवली कला आणि संस्कृती
शासनाने आता कारागीरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना चालना देणे हीच कारागीर महाकुंभाची फलश्रुती ठरेल : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी
कोल्हापूर ०४ प्रमोद पाटील
समाजातील अठरापगड जातीतील कारागीरांच्या वर्गातील विणकाम करणारे, लोहार असे व्यवसाय काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. या कारागिरांच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने त्यांना कायमस्वरुपी व्यासपीठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असे जिल्ह्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थ नोकरीनिमित्त मुंबईसारख्या महानगरात स्थलांतरित झाली आहेत. खरेतर कोल्हापूर जिल्हा निसर्ग, संसाधने आणि दरडोई उत्पन्नात अग्रेसर असूनही या नागरिकांच्या हाताला पर्यटन उद्योगांतून रोजगारप्राप्ती होवू शकते. या दृष्टीनेही राज्य सरकारने जाणिवपूर्वक प्रयत्नशील रहावे, असे आवाहन प.पू. काडसिध्देश्वर स्वामी यांनी केले. कणेरी मठावर आयोजित केलेल्या कारागिरी महाकुंभ उपक्रमाच्या सांगता समारोपावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आम. राहूल आवाडे, म्हाडाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते समरजित घाटगे, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी, कोल्हापूर व पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी येथील मुख्य प्रवेशद्वार येथे कारागीर महाकुंभ भरवण्यात आला होता. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या या उपक्रमाची सांगता शनिवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कणेरी मठावर अलिकडच्या काळात भारतीय संस्कृतीचे जतन किंवा जोपासना करण्याच्यादृष्टीने विविध उपक्रम, नाविण्यपूर्ण प्रदर्शन भरवून एक चांगला संदेश देशात जात आहे. त्यामुळे येथे भेट देवून जाणाऱ्या अनेक लोकांच्या जीवनात आनंद आणि उर्जा निर्माण होत आहे. हे लक्षात घेतले तर कणेरी मठावर समाजाला, मनुष्य जातीला आवश्यक असणाऱ्या विविध गोष्टींचे विद्यापीठ व्हावे, अशीही अपेक्षा पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली.
प. पू. काडसिध्देश्वर स्वामी म्हणाले, महात्मा गांधीजी यांनी खेड्याकडे चला, असा महत्वपूर्ण संदेश दिला होता. आजच्या काळातही हा संदेश लागू पडणारा आहे. मात्र, स्थानिकांना त्यांच्याच जिल्ह्यात रोजगार मिळाला तर ती खेडी स्वयंपूर्ण होतील आणि महानगरांकडे वळणाऱ्या लोंढ्यांना थोपविता येवू शकेल. आपल्याकडे अठरापगड जातीतील सर्व कारागीर पूर्वी अस्तित्वात होते. आता त्यातील लोहार, विणकाम करणारे असे कारागीर पहायला मिळत नाहीत. यासाठी कारागीरांना प्रोत्साहान देण्याची अत्यंत गरज आहे, देशात जवळपास १० कोटी कारागिर असून त्यांच्यासाठी केंद्राची विश्वकर्मा योजना आहे, त्याचाही लाभ घेता येवू शकेल, असेही असेही काडसिध्देश्वर स्वामी यांनी बोलून दाखवले.
प. पू. काडसिध्देश्वर स्वामी पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड, चंदगड यासारखे तालुक्यांपुढे स्वित्झर्लंड देशही फिफा पडेल. मात्र, आपल्याकडील बराच तरुणवर्ग पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या महानगराकडे धावतोय. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील २७०० गावांतील घरात वास्तव्याला नसल्याचे समोर आले आहे, ही चिंताजनक बाब आहे. याचबरोबर लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघात पर्यटनस्थळे विकसित करुन पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. आधुनिकिकरणाच्या नावाखाली येणारी विविध संकटे थोपवायची असतील, त्यातून युवा पिढीला वाचवायचे असेल तर ही जूनी कला नव्या पिढीने अवगत करुन आपला उध्दार केला पाहिजे, असेही काडसिध्देश्वर स्वामी यांनी बोलून दाखवले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, २०१४ पूर्वी देशात ३५० स्टार्टअप होते. आज ४ लाख स्टार्टअप आहेत. काडसिध्देश्वर स्वामी यांना मी महाराज असे न संबोधता मी शास्त्त्रज्ञ असे म्हणतो. कारण ते वारंवार नवनवीन प्रयोग करतात. कारागीर महाकुंभांचा मेळावा भरवता येवू शकतो, हा विचार कोणाच्याही मनाला शिवणार नाही. मात्र, या ठिकाणी हे शक्य झाले आहे. या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून हजारो जण प्रेरणा घेवून जाणार आहेत. हस्तकलेला जगभरात मोठी किंमत आहे. यातून भविष्यात या कारागिरांना मोठ्या संधी उपलब्ध होवू शकणार आहेत. अशा उपक्रमातून भारतीय संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचे काम होत आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
राहूल आवाडे यांनी सांगितले की, महाकुंभच्या उद्घाटनाला काही कामानिमित्त मी येवू शकलो नाही. मात्र, सांगता समारंभावेळी आवर्जून आलो आहे. हिंदू समाजाच्या जागरुकतेच्यादृष्टीने भरविण्यात आलेला कारागीर महाकुंभ महत्वपूर्ण आहे. एकीकडे अमेरिका, इराण सारखे देश एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात बॉम्बहल्ले करताहेत. तर दुसरीकडे भारताचे जागतिक पातळीवर महत्व वाढीस लागताना दिसतेय. २०२४ पासून देशाला नरेंद्र मोदींच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले आहे. तर काडसिध्देश्वर स्वामीसारख्या आदर्शवत गुरुंच्या माध्यमातून देशाला एक संस्कारक्षम दिशा मिळते आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी समरजित घाटगे म्हणाले, अठरापगड जातीतील विविध कारागिरांना एकत्र करुन त्यांच्या कलेला या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देण्यात आले आहे. हे कौतुकास्पद आहे.असाच कार्यक्रम केंद्रामार्फत कागलमध्ये व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी मांडली.
या महाकुंभमध्ये एकूण १५० कलाकार, कारागिरांचा स्टॉल होता. त्यापैकी ४६ स्टॉलवाल्यांच्या वस्तू विक्रीस गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ज्यांच्या वस्तू किंवा उत्पादने शिल्लक राहतील, ती उत्पादने कणेरी मठ संबंधितांकडून खरेदी करेल, अशी माहिती काडसिध्देश्वर स्वामींनी दिली. नविद मुश्रीफ यांनी मनोगत मांडताना कणेरी मठाला विविध उपक्रमांत सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जालंदर पाटील, यशवर्धन बारामतीकर, जे. पी. वड्ड, डॉ. वर्षा पाटील, रविंद्र लाड, बसंतकुमार सिंग खादी ग्रामोद्योग संयोजक , विवेक सिद्ध, विक्रम पाटील, विजय सरगर, प्रल्हाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक यशोवर्धन बारामतीकर तर सूत्रसंचालन विवेक सिध्द यांनी केले.
गेली पाच दिवस चालेल्या या कारागिर महाकुंभमध्ये १७ राज्यातून सुमारे २०० कारागिरी सहभागी झाले होते. कारागीरांच्या साठी पूर्णपणे मोफत स्टॉलसह येण्याजाणायचा खर्च हि सिद्धगिरी संस्थान मठाने दिला हे या महोत्सवाचे विशेष वैशिष्ठ्य होते. यावेळी लोकांचा प्रतिसाद इतका प्रचंड होता कि सर्व स्टॉलधारकांच्या अभिनव कलाकुसरींची विक्री अतिशय विक्रमी प्रमाणात झाली. तसेच विविध तंत्रज्ञ व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाच दिवस प्रकल्प सादर केले. यातील प्रथम क्रमांक राजाराम बापू टेक्निकल महाविद्यालय ईश्वरपूर यांना, द्वितीय आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय आष्टा यांना तर तृतीय क्रमांक डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच विविध कारागिरांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम संपन्न होऊन हि रात्री उशिरा पर्यंत लोक या कारागीर महाकुंभास भेट देत होते. गेल्या पाच दिवसात तब्बल ४ ते ५ लाख लोकांनी या महोत्सवास भेट दिली.







