गोकुळ कडून दूध उत्पादकांना दसऱ्यालाच दिवाळी भेट
१३६ कोटीचा फरक दूध उत्पादकांना मिळणार....
कोल्हापूर ३० अविनाश काटे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी खरी अर्थवाहिनी आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणे, सभासदहिताच्या विविध योजना राबविणे, काटकसरीचा कारभार, प्रभावी प्रशासन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ या माध्यमातून गोकुळने सातत्याने प्रगती साधली आहे.
दूध उत्पादकांच्या श्रमांचा सन्मान राखत आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध राहत गोकुळ दूध संघाने यंदाही दिवाळीपूर्वी दर फरकाचा मोठा निर्णय घेतला आहे. गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही अंतिम दूध दर फरकाचा लाभ मिळणार असून, तब्बल १३६ कोटी ०३ लाख रुपयांची उच्चांकी रक्कम दि ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती आज गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
.ही रक्कम गत वर्षीच्या तुलनेत २२ कोटी ३७ लाखांनी अधिक आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी गोकुळ संलग्न सुमारे ५ लाख ८ उत्पादक सभासदांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे.
संचालक मंडळ व व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे गोकुळने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. आगामी काळात २० लाख लिटर टप्पा पार करून २५ लाख लिटर संकलन करणे म्हैस दूध संकलन वाढवणे आणि उत्पादकांना जास्तीत जास्त दर देणे हे गोकुळचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नाविद मुश्रीफ यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला चेअरमन नाविद मुश्रीफ सह , माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक विश्वास पाटील , अरुण डोंगळे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.



