जहाजातली नोकरी विषयक रविवारी करिअर मार्गदर्शन शिबिर : युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा
कोल्हापूर ९ प्रमोद पाटील
आपल्या महाराष्ट्र राज्याला इतका विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असतानाही आपल्या राज्यातील मुले आजही मर्चेंट नेव्हीसारख्या सुंदर आणि विशेष विभागात अगदीच विरळ प्रमाणात कार्यरत आहेत आणि हे सर्व योग्य वेळी, योग्य माहिती नसल्याने घडत आहे. मराठी मुलांना योग्य ती माहिती मिळावी म्हणून मर्चेंट नेव्ही (जहाजातली नोकरी ) करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
येत्या रविवारी ता.१२ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता शाहू स्मारक भवन येथील मिनी सभागृहात मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यात जी माहिती देत आहे त्याचा फायदा मराठी बांधवांना व्हावा हाच एकमेव उद्देश आहे. असे इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर के लाईन शिपिंग कंपनीचे बाळासाहेब पाटोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाटोळे म्हणाले, या क्षेत्रात उत्तर भारतीय मुले, ज्यांनी आयुष्यात कधी समुद्र पाहिलेलाही नसतो, त्यांनी हा विभाग जवळपास काबीज केलाय, आणि आपण, ज्यांच्याकडे इतका विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे, ते मात्र या नोकरीपासून वंचित राहिले आहेत. आणि याला कारण म्हणजे योग्य माहिती सहज उपलब्ध नसणे. मराठी टक्का या विभागात वाढलाच पाहिजे. गरजू व मर्चेंट नेव्हीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती पोचवणे हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. गेली २८ वर्षे आपण या क्षेत्रात कार्यरत आहे. मराठी तरुणांची संख्या यात कमी दिसल्याने त्यांना या क्षेत्रात आणण्यासाठी अशाप्रकारे मार्गदर्शनपर व्याख्यान देत असल्याचे बाळासाहेब पाटोळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जमदग्नी करणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाळासाहेब पाटोळे यांनी केले. या पत्रकार परिषदेला संदीप पाटोळे उपस्थित होते.



