वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातील बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करा - आमदार अमल महाडिक यांच्या सूचना

 वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातील बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करा - आमदार अमल महाडिक यांच्या सूचना


कोल्हापूर ८ प्रमोद पाटील 

सलग सुट्ट्या आणि शालेय सहलीमुळे कोल्हापूर शहर हाउसफुल झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत आहे. अशातच बंद अवस्थेत असलेल्या ट्रॅफिक सिग्नलमुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे. विशेषतः स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका ते रेल्वे उड्डाणपूल, उमा टॉकीज या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. बंद अवस्थेतील सिग्नल मुळे वाहतूक कोंडी बरोबरच प्रदूषणातही भर पडत आहे. या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या समवेत बैठक घेतली. शहरातील अनेक सिग्नल बंद का आहेत? अशी विचारणा महाडिक यांनी केली. ज्या ठिकाणी वीज पुरवठा अथवा तत्सम समस्यांचा सामना करावा लागतो त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावा शासनाकडून यासाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. 

त्याचबरोबर शहरातील काही सिग्नल्सवर वाहतुकीला अडथळा होईल अशा रीतीने अतिक्रमण झाले आहे हे अतिक्रमण हटवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने कारवाई करावी. शहर वाहतूक शाखेकडे असलेली बहुतांश बॅरिकेट्स जीर्ण आणि मोडकळीस आलेली आहेत. त्या बॅरिकेटची दुरुस्ती आणि रंगकाम महाडिक उद्योग समूहातर्फे केले जाईल असेही महाडिक यांनी सांगितले. 

कोल्हापूर शहरातील पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल यंत्रणा सुधारल्यास होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची मागणी आमदार महाडिक यांनी केली. 

एकंदरीतच आमदार महाडिक यांच्या बैठकीनंतर तरी शहरातील सिग्नल यंत्रणेत सुधारणा होते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.