तुमच्या घरावर कोणी लाथा घातल्या तर त्याची आरती करणार का? - गायत्री राऊत

 तुमच्या घरावर कोणी लाथा घातल्या तर त्याची आरती करणार का? - गायत्री राऊत 



भारती पवार यांच्या टिकेला जोरदार उत्तर 


कोल्हापूर, दि. १४ प्रमोद पाटील 

तुमच्या घरात छोटेखानी सुरु असलेल्या कार्यक्रमात सर्वजण जेवत असताना तुमच्या घराच्या दारावर शेजाऱ्याने लाथा घातल्या तर तुम्ही दारात जावून त्याची आरती केली असता का, असा सवाल भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत यांनी कॉंग्रेसच्या भारती पवार यांना केला. महायुती उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ अक्कमादेवी मंडपात पार पडलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

काल भारती पवार यांनी केलेल्या आरोपास गायत्री राऊत यांनी जोरदार उत्तर दिले. कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचे व्यक्तिमत्व सर्वाना चांगलेच माहीत आहे. त्यांचा स्वभाव रांगडा असला तरी उगाचच कोणाच्या अंगावर धावून जाणे त्यांच्या रक्तात नाही. त्यावेळी नेमके काय झाले याची माहिती घ्यावी मग पवार यांनी आपले तोंड उघडावे, असा पलटवर राऊत यांनी केला आहे.

क्षीरसागर यांचे त्या शेजाऱ्याशी वैर नव्हते. किरकोळ भांडणाला विरोधकांनी राजकारणाची फोडणी दिली. त्या शेजाऱ्याला भडकावण्याचे काम केले. पण काही काळानंतर त्या शेजाऱ्यांना आपला वापर करून घेतल्याचे लक्षात आले. सर्व प्रकरणावर पडदा पडला असताना आता यावर बोलायची गरज नाही. तुमचे नेते आणि उमेदवार किती धुतल्या तांदळाचे आहेत, हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला जुनी प्रकरणे बाहेर काढायची तर काढा. मग आम्हीही आमचा पेटारा उघडू, असा इशारा राऊत यांनी दिला. 

यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वीच जयप्रभा स्टुडिओ विषयी जाहीर खुलासा केला आहे. या ठिकाणी बांधकाम प्रकल्प होणार, अशी आवई उठवणाऱ्या विरोधकांनी जयप्रभा स्टुडिओला एकदा भेट द्यावी. आणि वस्तुस्थिती जाणून घ्यावी. उगाचच साप साप म्हणून जमीन बडवू नये , असा सल्लाही त्यांनी दिला. आपण काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केले तर बघवत नाही, ही काँग्रेसची जुनी सवय आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांपासून गल्ली बोळातील नेत्यांच्या ही सवय अंगवळणी पडली आहे. स्वतः काय केले हे सांगण्यासाठी काही नसल्याने विरोधक विकासकामावर बोलण्याऐवजी नको ते मुद्दे उकरून काढत आहेत. विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर येऊन बोलणे थांबवावे अन्यथा आम्हीही जशास तसें उत्तर देऊ शकतो हे लक्षात ठेवावे, असा इशारा महेश जाधव यांनी दिला.

यावेळी अशोक देसाई, विशाल शिराळकर, पद्माकर कापसे, रविकिरण गवळी, संतोष माळी, महेश यादव, अमर साठे, हेमंत आराध्य आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.