6500 किमी साहसी प्रवास करत कोल्हापूरच्या ‘रॉयल रायडर्स’चा नेपाळ रायडर्स मीटमध्ये झंझावाती सहभाग; पर्यटनालाही नवी दिशा
कोल्हापूर ०६ (मिलिंद कुलकर्णी)
साहसी मोटरसायकल रायडिंगच्या क्षेत्रात कोल्हापूरचा झेंडा उंचावत रॉयल रायडर्स कोल्हापूर क्लबच्या सदस्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या Nepal Riders Meet (NRM) मध्ये दमदार सहभाग नोंदविला. या सहभागामुळे कोल्हापूरच्या साहसी क्रीडा संस्कृतीसोबतच पर्यटन क्षेत्रालाही नवी ओळख मिळाली आहे.
नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय रायडर्स मेळाव्यात जयदीप पवार (अध्यक्ष, रॉयल रायडर्स कोल्हापूर), शीतल मुकरे (संचालक), तसेच पांडुरंग चव्हाण आणि जोनिश जैन यांनी उत्साहात सहभाग घेतला. विविध देशांतील आणि भारतातील अनेक रायडिंग क्लबच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत मोटरसायकल पर्यटनाची अनोखी परंपरा जपली.
या कार्यक्रमाचे आयोजन Friends of Royal Enfield (FORE) Nepal या संस्थेने केले होते. नेपाळमधील ७८ रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेच्या पुढाकारातून हा मेळावा झाला. नेपाळ पर्यटन विभागाच्या निमंत्रणावरून भारतातील अनेक प्रतिष्ठित रायडिंग क्लबना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. रस्ते सुरक्षा जनजागृती आणि पर्यटनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रॉयल रायडर्स कोल्हापूरच्या सदस्यांनी कोल्हापूर ते उत्तराखंड मार्गे नेपाळ आणि परत कोल्हापूर असा सुमारे ६५०० किलोमीटरचा साहसी प्रवास पूर्ण केला. डोंगराळ रस्ते, विविध हवामान आणि लांबचा प्रवास पार करत त्यांनी आपल्या रायडिंग कौशल्याचा ठसा उमटवला.
दरम्यान, रॉयल रायडर्सचे उपाध्यक्ष यश सबनीस आणि हर्ष सबनीस यांनी देखील कोल्हापूर ते उत्तराखंड असा प्रवास करत तेथे आयोजित BOBMC (Brotherhood of Bulleteers & Motorcyclist Consortium) या राष्ट्रीय स्तरावरील भव्य मेळाव्यात सहभाग घेतला. भारतातील सुमारे ८०० रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेच्या कार्यक्रमाला देशभरातून रायडर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेपाळ रायडर्स मीटमध्ये भारतातील अन्य प्रतिष्ठित क्लबचेही प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामध्ये चेन्नईच्या Madbulls Club Madras कडून सेलेश कुमार, मुकेश पांडू आणि भरत पद्मनाभन, तर दिल्लीच्या Royal Beasts Club कडून कार्तिक आणि अर्पण दासगुप्ता यांनी सहभाग नोंदविला.
या संपूर्ण उपक्रमामुळे कोल्हापूरच्या रायडिंग संस्कृतीला नवे बळ मिळाले असून, साहसी पर्यटनाच्या दृष्टीने शहराची ओळख अधिक ठळक झाली आहे. तरुणांना सुरक्षित रायडिंग, पर्यटन आणि साहसी उपक्रमांकडे आकर्षित करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.



