प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचा १८ डिसेंबरला जाहीर नागरी सत्कार


प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचा १८  डिसेंबरला जाहीर नागरी सत्कार



कोल्हापूर १६ प्रमोद पाटील 

सामाजिक-राजकीय चळवळीतील नेते, समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते, समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे साठ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचा बुधवार, दि. १८ डिसेंबर, 2024 रोजी दुपारी १ वा.  राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार होणार असल्याची माहिती प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे सत्कार समिती, महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर, उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ कदम यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगलीचे ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तनवादी विचारवंत व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेते उदय नारकर, दलित महासंघ, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे उपस्थित राहणार आहेत. 

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे समाजशास्त्राचे प्राध्यापक होते. गेली 30 ते 40 वर्षाहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात दखलपात्र कार्य केले आहे. 

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी अन्याय अत्याचारांविरुद्ध लढाऊ आक्रमक अशा दलित महासंघ या संघटनेची स्थापना केली. मंडल आयोग व नामांतराची चळवळ, दुष्काळ परिषदांचे आयोजन, मंदिर प्रवेश लढा, पाणी प्रश्न आंदोलन, दलित आदिवासी महिला अत्याचाराविरुद्ध आंदोलन अशा विविध माध्यमातून लक्षवेधी व थरकाप उडवणारी अनेक आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली आहेत. त्यांनी आपल्या पी.एचडी.चे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे जर्मनीमध्ये सादर केले. जर्मनी बरोबरच इतर अकरा देशांमध्ये ते भ्रमंती करून आलेत. या काळात 50 हून अधिक संशोधनपर लेख त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले. देश-विदेशांमध्ये भ्रमंतीचे 'देशाबाहेर' हे प्रवास वर्णन साहित्यरूपाने शब्दबद्ध केले. या प्रवास वर्णनाबरोबरच 'सत्यशोधक अण्णा भाऊ साठे', 'नामांतर आणि नंतर,', 'जगातले सर्वधर्म बरखास्त करा!', 'समतावादी साहित्य : एक महाप्रवास' यासह 20 हून ग्रंथ त्यांच्या नावे आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे ते अध्यक्ष ही राहिले आहेत. शिवाजी विद्यापीठांमध्ये समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे ते सलग सात वर्षे अध्यक्ष होते. याचबरोबर आजही ते अनेक संघटनांमध्ये अध्यक्ष व इतर पदांवर कार्यरत आहात. समाजामध्ये समतेचा विचार रुजवण्यासाठी त्यांनी 'समतावादी संस्कृती चळवळी'ची स्थापना केली. या माध्यमातून सर्व महामानवांचा समतेचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक समतावादी साहित्य संमेलने भरवली.

सदर सत्कार समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष अनिल म्हमाने, उपाध्यक्ष : डॉ. शशिकांत खिलारे, सदस्य ॲड. रमेश शिंदे, दीपक चांदणे यांनी केले आहे. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.