किमान वेतनसाठी टिप्पर चालकांचे उपोषण सुरू त्वरित निर्णय घ्या, अन्यथा तीव्रता वाढवू - आप चा इशारा

 

किमान वेतनसाठी टिप्पर चालकांचे उपोषण सुरू 

त्वरित निर्णय घ्या, अन्यथा तीव्रता वाढवू - आप चा इशारा


कोल्हापूर ७ सिटी न्यूज नेटवर्क 

महापालिका टिप्पर चालकांची किमान वेतन टेंडर प्रक्रिया गेले सहा महिन्यांपासून सुरु आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन एक महिना उलटला तरी वर्क ऑर्डर निघालेली नाही. वर्क ऑर्डर त्वरित काढा या मागणीसाठी आम आदमी पार्टीने टिप्पर चालकांसोबत साखळी उपोषण सुरु केले. उपोषणाचा आज पहिला दिवस होता. 


सर्व तांत्रिक प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे, त्यामुळे वर्क ऑर्डर जाहीर करण्यास अडचण नव्हती. परंतु प्रक्रियेच्या संदर्भात तक्रारी आल्याचे कारण पुढे करत वर्क ऑर्डर काढली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासोबत आप शिष्टमंडळाची बैठक झाली. तक्रारींच्या अनुषंगाने ऑडिटर व वकीलांचा अभिप्राय घेत आहे, त्यामुळे यावर निर्णय घेण्यास वेळ लागत असल्याचे अडसूळ यांनी सांगितले. यावर आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी जोपर्यंत किमान वेतनचे टेंडर पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणून महापालिकेने त्याचा फरक टिप्परचालकांना द्यावा अशी मागणी केली. तसेच वर्क ऑर्डर काढण्यास विलंब करू नये, अन्यथा आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल असा इशारा दिला. 


पहिल्या दिवशी अरुण कांबळे, विनायक घाडगे, अजिंक्य जाधव व अमोल सोनावणे यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.


यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, विजय हेगडे, दुष्यंत माने, राकेश गायकवाड, दिलीप पाटील, जयसिंग चौगुले, मयूर भोसले, संजय नलवडे, मनोहर नाटकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.