कोल्हापूर ते श्री अक्कलकोट पायी दिंडीचे शनिवारी प्रस्थान

कोल्हापूर ते श्री अक्कलकोट पायी दिंडीचे शनिवारी प्रस्थान





 कोल्हापूर, दि. १२ प्रमोद पाटील 

मार्गशीर्ष व दत्त जयंती उत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील ३०० भक्त गेली आठ वर्षे अक्कलकोटला पायी चालत जात आहेत. यावर्षी शुक्रवारी (दि. १५ ) सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर येथील प्रयाग चिखली पंचगंगा नदी संगम, दत्त मंदिर येथे सर्व पदयात्रेकरू जमणार आहेत. दुसर्या दिवशी शनिवारी पहाटे पूजाअर्चा, संकल्प करून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील संस्थापक रमेश चावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.




या पदयात्रेत महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांना आता ओढ स्वामींच्या दर्शनाची लागली आहे. पदयात्रेतील सर्व भाविकांना अकरा दिवस चहा नाष्टा, महाप्रसाद, राहण्याची सोय मोफत करण्यात आली आहे. अजूनही पदयात्रेला येणार्या भक्तांनी शुक्रवारी, दि . १५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर येथील प्रयाग चिखली दत्त मंदिर येथे पदयात्रेसाठी नाव नोंदणी करून या सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


पदयात्रेचा मार्ग असा आहे.

शुक्रवारी, दि. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत भाविकांसाठी आपली प्रवासी बॅग घेऊन कोल्हापूर येथील प्रयाग तिर्थ संगमावर जमायचे आहे.‌*

१६ डिसेंबर, शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता प्रयाग संगमावर सर्व स्वामी भक्तांच्यावतीने स्वामी महाराजांना अभिषेक व संकल्प होऊन पदयात्रा अक्कलकोटकडे प्रस्थान होईल. येथून सकाळी सात वाजता शिवाजी पूल पंचगंगा नदी येथे येऊन कोल्हापूर शहरातून पदयात्रा मिरवणुकीने गंगावेश येथील श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या मठात येईल. तेथे महाराजांच्या रथाचे विश्वस्तांच्या हस्ते पूजन होईल. त्यानंतर पदयात्रा छ. शिवाजी चौकात पोहचेल. येथे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने महाआरती होईल. तेथून मार्केट यार्ड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारच्या महाप्रसादासाठी थांबेल. रात्री हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे पदयात्रा मुक्कामी जाईल. दुसर्या दिवशी दि. १७ डिसेंबरला जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दुपारचा मुक्काम होईल व रात्री मिरज येथील वारकरी भवन येथे मुक्काम होईल. १८ डिसेंबरला - कळंबी प्राथमिक शाळे शेजारी माळी यांच्या घरी दुपारी विश्रांती. तर खरशिंग, ता. कवठेमहांकाळ येथे मुक्कामासाठी पदयात्रा पोहोचेल. या ठिकाणी पदयात्रेकरूंसाठी अंतरंग प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा उलगडणारा, बहारदार मराठी भक्ती गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम "जय जय महाराष्ट्र माझा" आणि "गजर स्वामी नामाचा" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ डिसेंबर - दुपारी - कवठेमंहाकाळ, संध्याकाळी - नागज. २० डिसेंबर, श्री राम वस्ती जुनोनी, मुक्काम - जोतिबा हाॅटेल, पाचेगाव. २१ डिसेंबर दुपारी - ज्ञानराज ट्रान्सपोर्ट, सांगोला, रात्री मुक्काम - वाढेगाव, ता. सांगोला. २२ डिसेंबर - दुपारी - आंदळगाव, संध्याकाळी - मंगळवेढा. २३ डिसेंबर - दुपारी सिद्धेश्वर मंदिर, माचणूर, संध्याकाळी - वाघोली सूतगिरणी. २४ डिसेंबर - दुपारी - मीनाताई ठाकरे आश्रम शाळा, देगाव, संध्याकाळी - पंचमुखी परमेश्वर मंदिर, सोलापूर, २५ डिसेंबर - दुपारी - श्री स्वामी समर्थ सूतगिरणी, वळसंग, संध्याकाळी - श्री स्वामी समर्थ विसावा केंद्र, कोन्हाळी आणि २६ डिसेंबरला पदयात्रा श्री श्रेत्र अक्कलकोट येथे पोहचेल.


अक्कलकोट येथे सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणुकीने समाधी मठ व वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात पदयात्रेचा प्रवेश होईल. सायंकाळी सहा वाजता दत्त जयंती उत्सवानिमित्त सुंठवडा घेतल्यानंतर पदयात्रेचा समारोप होईल.


पत्रकार परिषदेला पदयात्रेचे , कार्याध्यक्ष सुहास पाटील, रमेश चावरे, यशवंत चव्हाण, गजानन शिंदे, सौ. वेणूताई सुतार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.