ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या- सायबर तज्ज्ञ संदीप गादिया

 ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या- सायबर तज्ज्ञ संदीप गादिया

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व विधी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ : संयुक्त विद्यमाने चर्चासत्र संपन्न



कोल्हापूर दि. १६ प्रतिनिधी 

ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या असा सल्ला सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी व्यापारी-उद्योजकांना दिला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व विधी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मोबाईलचा वापर बंद झाल्यानंतर मोबाईल डाटा, वायफाय, ब्ल्युटुथ बंद करायला अजिबात विसरु नका. मोबाईल मध्ये देखील अँटीव्हायरस चा वापर करा. मोबाईलला नेहमी पासवर्ड ठेवा व पासवर्ड कुठेही लिहू नका अथवा कोणाला सांगू नका. पब्लिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल अजिबात चार्ज करु नका. अशाने तुमच्या मोबाईल मधील माहिती चोरीस जाण्याची दाट शक्यता असते. तसेच चायनिज मोबाईल न वापरता ब्रँडेड मोबाईलच वापरा. ओटीपी न देताही हॅकर्स तुमच्या खात्यातील पैसे हडपू शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार कमीच करा.

 मोबाईल वर येणाऱ्या मॅसेजेस मधून कशी फसवणूक केली जाते व डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड धारकास कळू न देता त्याचे स्वॅपिंग करुन कशी फसवणूक केली जाते याचे प्रात्यक्षिकाव्दारे त्यांनी उदाहरण देत अशा मॅसेज अथवा कॉल ला उत्तर न देता असे मॅसेजेस व कॉल्स टाळा असा सल्ला त्यांनी दिला. क्रेडिट कार्डचा कार्ड प्रोटेक्शन विमा उतरुन घ्या. एटीएम मधून पैसे काढताना एटीएम मशिन अधिकृत असल्याची खात्री करा. युपीआय अॅप्सवर एकच पासवर्ड न ठेवता वेगवेगळा ठेवा व पासवर्ड नेहमी बदलत रहा. सेक्सटॉर्शन मध्ये फसवणूक झालेल्या अनेकांची उदाहरणे देत त्यांनी अशा केसेस मध्ये न घाबरता पोलीसांत तक्रार दाखल करा अशी सुचना केली.

 चर्चासत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. सुरुवातीस चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी हे चर्चासत्राचे आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट करत नाशिक येथे संदीप गादिया यांचे विचार ऐकल्यानंतर असेच चर्चासत्र कोल्हापुरात घेण्याचे निश्चित केले असल्याचे सांगितले.

 शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु पी. एस. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातही सायबर क्राईम विषयावर वेगळा विभाग घेण्यात येईल असे सांगून सायबर गुन्हे रोखण्यासाठी गुन्हा होणारच नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

 यावळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, खजिनदार हरीभाई पटेल, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, संपत पाटील, अॅड. इंद्रजित चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कायदा सल्लागार संतोष शहा, कायदा अधिकारी अनुष्का कदम, चेंबरचे संचालक, विविध संघटना प्रतिनिधी, व्यापारी-उद्योजक, कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

 आभार शिवाजी विद्यापीठ विधि विभागाचे विभाग प्रमुख विवेक धुपदाळे यांनी मानले. सुत्रसंचालन चेंबरच्या संचालिका सीमा जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.