पन्हाळगड-पावनखिंड मार्गावर शिवभक्तांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उभारणार : खासदार श्रीकांत शिंदे

 पन्हाळगड-पावनखिंड मार्गावर शिवभक्तांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उभारणार : खासदार श्रीकांत शिंदे



- मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

- पन्हाळगड, खोतवाडी, करपेवाडी, पांढरेपाणी, भातळी गावात सोई-सुविधा 


 पन्हाळगड 15 न्युज डेस्क

* साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेला पराक्रमी इतिहास अनुभवण्यासाठी देशभरातून हजारो युवा वर्ग पन्हाळगड-पावनखिंड वारीत भर पावसात सहभागी होत असतात. या शिवभक्तांची ठिकठिकाणी राहण्याच्या सुसज्ज व्यवस्थेसह पूर्णपणे आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली. पन्हाळगड-पावनखिंड विकास  आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या वतीने आयोजित पन्हाळगड पावनखिंड मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे होते. दरम्यान मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी नरवीर बाजीप्रभू देशपांडे  यांच्या पुतळ्याचे व वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन झाले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी इतिहास घडवला. कैक मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. पावनखिंडचा रणसंग्राम हा एक इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे.   वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद, बांदल सेना यांनी आपला पराक्रम गाजवून इतिहासात आपले नाव अजरामर केले. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटण्यासाठी धो धो प्रचंड कोसळणाऱ्या पावसातून महाराजांनी विशाळगड जवळ केला. दरम्यान वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, कृष्णाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंग जाधव यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. स्वराज्यावरची काय निष्ठा असते ती या शूरवीर मावळ्यांकडून शिकावी.  त्यांचा अजरामर इतिहास तरुणांपर्यंत नेण्याचे काम शिवराष्ट्र परिवारचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे व त्यांचे सर्व सहकारी गेल्या 30 वर्षापासून करतात हे अभिमानास्पद आहे. शिवराष्ट्र परिवार तरुणांना आयुष्यात जगण्याची चांगली दिशा देत आहे. अशा मोहिमांमध्ये सहभागी होऊन तरुणांनी राष्ट्र घडवण्यासाठी मोठे योगदान देणे आवश्यक आहे. पावनखिंड मार्गावर दरवर्षी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पन्हाळगड,  खोतवाडी ,  करपेवाडी,  आंबेवाडी, पांढरेपाणी आणि भातळी येथे सुसज्ज दोन मजली सभागृह बांधले जाईल. या पन्हाळगड पावनखिंड विकासाला आराखड्यास नुकत्याच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.  याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना कार्यवाही करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. पुढील वर्षी ही व्यवस्था सर्व शिवभक्तांना उपलब्ध असेल. पन्हाळगडावर बांदल सेनेचे शिल्प उभा करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

खासदार धैर्यशील माने म्हणाले, पन्हाळगड-पावनखिंड ऐतिहासिक मार्गावर शिवभक्तांसाठी जे काही लागेल ते देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. तरुणांना ऊर्जा देणाऱ्या या मोहिमेत मुक्कामाची सुसज्ज व्यवस्था होईल.

राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवराष्ट्र परिवाराने गेल्या 30 वर्षांपासून हा इतिहास जगभर पोहोचवला आहे. तरुणांनी अशा मोहिमात सहभाग घेऊन भविष्य घडवावे.  शिवभक्तांना लवकरात लवकर पावनखिंड मार्गावर मुक्कामाची सुसज्ज व्यवस्था उभा केली जाईल.  

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीयचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले.  शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी इतिहासासह पावनखिंड मोहिमे मागचा उद्देश विशद केला. 

या मोहिमेत वीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे, बाळासाहेब सनस, करण झावणे-पाटील, मोहीम प्रमुख गणेश कदम, विनायक जरांडे, मोहन खोत, राजेंद्र पवार, विराज साळुंखे,  अभिजीत चव्हाण, ऋतुराज चौगुले,  शुभम चौगुले, रमेश जाधव, विजय खोत, गजानन परीट, विक्रांत भागोजी,  उमेद रजपूत, अभिजीत पवार, अतुल कापटे यांच्यासह देशभरातून 700 हून अधिक मोहिमेवर सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.