सीसीटीव्हीबाबत सरकारने धोरण स्पष्ट करावे : आमदार सतेज पाटील यांची मागणी
![]() |
| संग्रहित |
कोल्हापूर १६ प्रतिनिधी
राज्यातील सर्वच शासकीय अस्थापनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे; मात्र त्यासाठी निधीची तरतूद केली आहे का? कधी केली जाणार? टाईम बाऊंड किती असेल? तसेच खासगी आस्थापनेतील व्हिडीओ व्हायरल केले जातात. त्यांच्यावर कारवाईचे धोरण काय असेल, असा प्रश्न विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, याबाबतचे धोरण येणाऱ्या अधिवेशनात मांडले जाईल.
आमदार सतेज पाटील म्हणाले, मागच्या वेळी याच सभागृहामध्ये मी एक प्रश्न विचारला होता की, आता खासगी आस्थापनांवर सीसीटीव्ही आहे. खासगी आस्थापनांचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण बघतोय. ते 'प्रायव्हसी'साठी घातक आहे. त्यामुळे ते व्हायरल करणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याबाबत शासनाने योग्य ते धोरण ठरवणे गरजेचे आहे.
प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री पंकज भोयर म्हणाले, आमदार सतेज पाटील यांचा प्रश्न कोल्हापूर महानगरपालिकेत बसवलेल्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने होता; परंतु आपण आता विचारणा केली की, संपूर्ण राज्यामध्ये सीसीटीव्हीचे धोरण काय असले पाहिजे. वेगवेगळ्या आस्थापनांमार्फत सीसीटीव्ही आता सर्व ठिकाणी लावण्यात येत आहेत. याच्यासाठी एक साधी, सुलभ एसओपी होण्याचे निर्देश, एसओपी बनवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिलेले आहेत. याबाबतचे धोरण येणाऱ्या अधिवेशनात मांडले जाईल.



