"रांगडा' १२ जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित

 "रांगडा' १२ जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित



"रांगडा" मध्ये अनुभवता येणार कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार


कोल्हापूर ४ प्रमोद पाटील 

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती, बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रेमकथा, राजकारण, अॅक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून, १२ जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 


शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी "रांगडा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून  दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन तर  अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे,अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर,राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.


सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे रांगडा चित्रपटाचं मुख्य कथासूत्र आहे. त्याशिवाय तगडे, बलदंड नायक, खलनायक, देखणी नायिका असल्यानं प्रेमकथा, राजकारण, तुफान अॅक्शनचा धडाकेबाज तडका या चित्रपटात आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचं कथानक आजवर अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर आलं असलं, तरी त्यात रांगडा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाच्या सकस कथानकाची मांडणी तांत्रिकदृष्ट्या तितक्याच उत्तम पद्धतीनं करण्यात आल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणून आता केवळ १२ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर मोठ्या पडद्यावर रांगडेपणाचा अस्सल अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.