'विषय हार्ड' चित्रपटास जोरदार प्रतिसाद

 'विषय हार्ड' चित्रपटास जोरदार प्रतिसाद



कोल्हापूर (इचलकरंजी) २८ प्रमोद पाटील 

 वेगळ्या प्रेमकथेचा व भन्नाट विनोदी म्हणून सध्या सर्वत्र चर्चेत असणारा मराठी चित्रपट  'विषय हार्ड ' प्रेक्षकांना आवडतं असून महाराष्ट्र भर हा चित्रपट गाजत आहे. नुकताच या चित्रपटाचा विशेष शो इचलकरंजी येथील फाॅर्च्यून मल्टीप्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शो हाऊसफुल्ल केला. यावेळी दिग्दर्शक, लेखक,निर्माता आणि मुख्य भूमिका साकारणारा युवा अभिनेता सुमित पाटील, 

  सिनेमॅटोग्राफर अभिषेक शेटे, व इचलकरंजीचा युवा कलाकार व कास्टिंग डायरेक्टर सागर लंगोटे याच्यासह रणजित मिणचेकर, नितीन कुलकर्णी, राकेश गाट, असंग आदी चित्रपट टिम उपस्थित होती. 

मूळात इंजिनियर असणाऱ्या सुमितने चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर लघुचित्रपट, टीव्ही एपिसोड्स, रिॲलिटी शोज, जाहिराती अशा माध्यमातून दहा वर्षे काम केले आणि आपल्या अनुभवाच्या पायावर 'विषय हार्ड 'ची निर्मिती केली.  'विषय हार्ड' ही गोष्ट शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील लोकांना आपल्याच भागात घडणारी गोष्ट वाटत आहे.

अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत.

ही नेहमीची प्रेमकथा नाही कारण त्यातील नायक- नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं १२ वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त ५ तास आहेत आणि परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. पर्ण पेठे या कसलेल्या अभिनेत्रीने आपली नायिकेची भूमिका अतिशय दमदारपणे वठवली आहे. या चित्रपटाद्वारे सुमित हा नवोदित कलाकार लेखक, दिग्दर्शक, नायक आणि निर्माता म्हणून सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करत आहे. नवोदित असूनही  आपली छाप पाडण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्या भूमिकाही उत्कृष्ट झाल्या आहेत. 

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे इचलकरंजीचा सागर लंगोटे याने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले असून अभिनयाबरोबरच कास्टिंग डायरेक्टरची जबाबदारी छान पेलली आहे. गीत, संगीत, सिनेमॅटोग्राफी, कला, नृत्य, दिग्दर्शन, वेशभूषा, संकलन आदी सर्व पातळ्यांवर चित्रपट दर्जेदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

या चित्रपटाला इचलकरंजी,गडहिंग्लजसह महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.