दिव्या व दिशा पाटील,अरीना मोदी व सृष्टी जोशीराव यांची महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

 

दिव्या व दिशा पाटील,अरीना मोदी व सृष्टी जोशीराव यांची महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड


कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा


कोल्हापूर २० प्रमोद पाटील 

- चेस असोसिएशन कोल्हापूर ने विझार्ड चेस क्लब, राजारामपूरी नववी गल्ली येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.‌..

जैन सोशल ग्रुप कोल्हापूर ने पुरस्कृत केलेल्या या स्पर्धा स्विस् लीग पद्धतीने एकूण पाच फेऱ्यात घेण्यात आल्या.अंतिम पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित दिव्या पाटील व द्वितीय मानांकित दिशा पाटील या जयसिंगपूरच्या दोघा जुळ्या बहिणींचे समान साडेचार गुण झालेमुळे सरस बकोल्झ टायब्रेक गुणानुसार दिव्याला अजिंक्यपद मिळाले तर दिशाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.दिव्या पाटील,दिशा पाटील,अरिना मोदी व सृष्टी जोशीराव या चौघींची निवड पुणे येथे 29 ते 31 मे दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात करण्यात आली‌ आहे. या चौघींना रोख रक्कम व चषक देऊन गौरविले.त्याचबरोबर राज्य स्पर्धा खेळण्यासाठी टी-शर्ट व स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने दिले जाणार आहे.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ जैन सोशल ग्रुप कोल्हापूर मेन च्या अध्यक्षा सौ.दीपा परीख,सौ.शरयू शहा,सौ.शिल्पा शहा,सौ.शैला पाटील व सौ.प्रतिमा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले मुख्य पंच आरती मोदी,अनिश गांधी, मनीष मारूलकर, उत्कर्ष लोमटे, धीरज वैद्य व किरण शिंदे उपस्थित होते.

अंतिम पाचव्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने चौथ्या मानांकित नांदणीच्या संस्कृती सुतारला पराभूत करून साडेचार गुणासह अजिंक्यपदाला गवसणी घातली..तर द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटील ने कोल्हापूरच्या वेदिका मदनेवर सहज विजय मिळवत साडेचार गुणासह उपविजेतेपद पटकाविले.तिसऱ्या पटावर तृतीय मानांकित कोल्हापूरच्या अरीना मोदी ने सहाव्या मानांकित कोल्हापूरच्याच सौंदर्य आरवाडे वर मात करत चार गुण करत आपले तिसरे स्थान निश्चित केले.चौथ्या पटावर जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ला पराभूत करून कोल्हापूरच्या सृष्टी जोशीराव ने साडेतीन गुणासह चौथे स्थान प्राप्त केले. चौथी मानांकित नांदणी च्या संस्कृती सुतारला तीन गुणासह पाचवे स्थान मिळाले तर सहावी मानांकित कोल्हापूरची सौंदर्या आरवाडे तीन गुणांसह सहाव्या स्थानी आली..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.